कहर: कोरोनाचा उच्चांक, २४ तासात नवे १ लाख २६ हजार रुग्ण

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचे संक्रमण गतीने फैलावले आहे. बुधवारी कोरोनाचे नवे सव्वा लाखाहून अधिक रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात १ लाख २६ हजार ३१५ नवे रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी सर्वाधिक १.१५ लाख नवे रुग्ण आढळले होते.

देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी २९ लाख २८ हजार ५७४ इतकी आहे. तर एकूण मृत्यू १ लाख ६६ हजार ८६२ झाले आहेत. एक कोटी १८ लाख ५१ हजार ३९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ९ लाख १० हजार ३१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९८ हजार ६७३ जणांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात बेड्सची टंचाई
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामीळनाडू या राज्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वात वाईट स्थिती आहे. महाराष्ट्रात काल ६० हजार नवे रुग्ण आढळले. बुधवारी ५९,९०७ रुग्ण आढळून आले. हे देशात आढळलेल्या रुग्णसंख्येच्या ५० टक्के आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांत बेड्स उपलब्ध नसल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्याने प्रशासनाला स्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले आहे.

दिल्लीतही गंभीर स्थिती
दिल्लीत दररोज पाच हजार रुग्ण आढळत आहेत. दिल्लीत संक्रमण सहा पट वाढले आहे. बुधवारी ५,५०६ नवे रुग्ण आढळले. दिल्ली एम्सची ओपीडी सेवा बंद करण्यात आली आहे. दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी कोरोना रिपोर्ट दाखविणे अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ६०२३ तर कर्नाटकमध्ये ६९७६ रुग्ण आढळले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या नऊ लाखांवर गेल्याने स्थिती गंभीर आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध, अंशतः लॉकडाउन आणि नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

रायपूर-छिंदवाडामध्ये लॉकडाउन
छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये नऊ एप्रिलपासून १९ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे. तर मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यातही लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यांत नाइट कर्फ्यू आहे.

पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
देशातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आगामी चार ते पाच आठवडे स्थिती गंभीर असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here