सांगली : जिल्ह्यातील कारखानदारांनी ‘कोल्हापूर ऊसदर पॅटर्न’ मान्य करावा अन्यथा शुक्रवार, दि. १ डिसेंबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना काटा बंद आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातील कारखानदारांची काटमारी व उतारा चोरीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. उसाला दर न देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची गट्टी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
बुर्ली (ता. पलूस) येथे संघटनेने घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या साखरेची किंमत ३२०० रुपये धरली आहे, तिचा सध्याचा दर ३८०० रुपये आहे. यातून कारखानदारांना ७०० रुपये फायदा झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचे पैसे मिळाले पाहिजेत. यातून मिळणारे १२०० कोटी रुपये ३७ कारखानदारांच्या कुटुंबामध्येच राहणार आहेत. हा पैसा १५ लाख ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती एक आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांची रिकव्हरी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जादा आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील फॉर्म्युल्याप्रमाणे दर द्यायला काहीच अडचण नाही. आज जिल्ह्यातील कारखानदार एकवटले आहेत, त्यांनी काही बोलायचे नाही असे ठरवले आहे. शेतकरी किती दिवस टिकतात ते पाहत आहेत. शेतकऱ्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आता शेतकरीदेखील एकवटला आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच उमेश पाटील, शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, पी. जी. पाटील, संदीप चौगुले, जयकुमार कोले, महेश खराडे, संजय बेले, किरण पाटील, अनिल साळुंखे, अमोल पाटील, बाळासाहेब जाधव, विष्णू माळी, इम्रान पटेल, भाऊसाहेब पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.