बेंगळुरू : कर्नाटक सरकारने आज, ११ मे रोजी साखर कारखानदारांची बैठक बोलावली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचे थकीत पैसे देण्याबाबत कालमर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग तथा ऊस मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी मंगळवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न पाहता बैठक आयोजित करण्याची घोषणा केली होती. या वर्षी ऊस गाळपाचा उच्चांक प्रस्थापित झाला असल्याचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सहकारी साखर कारखान्यांच्या सर्व मालकांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. मंत्री शंकर पाटील म्हणाले की, आम्ही या बैठकीत थकीत ऊस बिलांबाबत डेटा जमा करु. आणि सरकार लवकरात लवकर हे पैसे देण्याबाबत नियमांनुसार निर्णय घेईल.
त्यांनी सांगितले की, मी २०२१ मध्ये उपाययोजना केली होती आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे गतीने देण्याची प्रक्रिया केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही लवकरच त्यांचे पैसे मिळतील.