कर्नाटक : उसाच्या घटत्या उताऱ्याचा गुळ उत्पादनावर विपरीत परिणाम

बेळगावी : राज्यात यंदा दुष्काळ पडला असून त्याचा जिल्ह्यातील गूळ उत्पादक घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने गुळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. उसाच्या रसाचे उत्पादन सर्वसामान्य प्रमाणापेक्षा कमी असल्याने गूळ उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या बाजारात गुळाची किंमत ५,००० रुपये प्रती क्विंटल आहे. पारंपरिक गुळाबरोबरच सेंद्रीय गुळाला मोठी मागणी आहे.

गुळाचे उत्पादन घटल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांचा परतावा कमी झाला आहे. बेळगाव-बागलकोट मार्गावर शहराच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये १०० हून अधिक गुऱ्हाळघरे होती. कामगारांची टंचाई आणि साखर कारखान्यांना ऊस पाठवण्यास शेतकरी पसंती देत असल्यामुळे गुऱ्हाळघरांची संख्या दरवर्षी कमी होत आहे.

यापूर्वी सांबरा गावात २२ गुऱ्हाळघरे होती. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ३.०८ लाख हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. सांबरा येथे गुऱ्हाळघर चालवणारे ज्योतिबा जोई म्हणाले, आम्ही या हंगामात नोव्हेंबरमध्ये गूळ बनवायला सुरुवात केली. यंदा उसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी आम्ही प्रती एकर उत्पादनातून ६० क्विंटल गूळ तयार करू शकत होतो. ४,००० रुपये प्रती क्विंटल या दराने आम्हाला एकरी २.४ लाख रुपये मिळायचे. आता गुळाचे उत्पादन घटल्याने आमची कमाईही घटणार आहे. शिवाय गुऱ्हाळघरांना मजूर टंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे.

जोई म्हणाले की, उसाचे गाळप करण्यापासून ते वाहतुकीसाठी गूळ लोड करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी आम्हाला किमान १६ कामगारांची आवश्यकता असते. कामगारांना सकाळी लवकर कामावर यावे लागते आणि रोजची मजुरी केवळ ३०० रुपये आहे. जोई म्हणाले की, गुळाचे दर प्रती क्विंटल ५,००० रुपयांपर्यंत वाढले असतानाही, शेतकर्‍यांना अपेक्षित परतावा मिळत नाही. कारण दुष्काळामुळे उसापासून रस कमी निघत आहे. त्यामुळे गुळाचे उत्पादन घटत आहे.

शेतकरी चन्नायस्वामी माथाड म्हणाले की, दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटल्याने सरकारने आम्हाला मदतीचा हात दिला पाहिजे. गुळाला चांगला भाव असूनही चांगला परतावा मिळत नाही. काही शेतकरी गुऱ्हाळघरांना ऊस विकण्यास प्राधान्य देतात, कारण त्यांना लवकर पैसे मिळतात. तर साखर कारखानदारांकडून पैसे मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here