बेंगळुरू : देशात कोविड १९च्या रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने आता कोविड १९ चाचणीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांवर घातलेले निर्बंध हटवले आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आता निगेटिव्ही आरटीपीसीआर अहवालाची गरज नाही असे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र, लोकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक राहील.
गेल्या महिन्यात कोविड १९च्या रुग्णांत झपाट्याने वाढ झाल्याने कर्नाटक सरकारने विषाणू रोखण्यासाठी राज्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची सक्ती केली होती. कर्नाटक सरकारच्या नव्या आदेशात म्हटले आहे की, सध्याची कोविड १९ची स्थिती राहता महाराष्ट्र राज्यातून विमानप्रवास, रेल्वे, रस्ते वाहतूक तसेच खासगी वाहनातून येणाऱ्या नागरिकांना निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल दाखविण्याची सक्ती असलेला आदेश रद्द करण्यात आला आहे.