इथेनॉलला बूस्ट : रेशीमकीटकच्या कचऱ्यापासून बायोइथेनॉल, बायोहायड्रोजन निर्मितीसाठी संशोधन सुरू

म्हैसूर : पर्यावरणपूरक बायोरिफायनरीजच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास उपक्रमांना चालना देण्यासाठी, म्हैसूरमधील केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (CSRTI) तुतीचे कोंब (mulberry shoot) आणि रेशीम किड्यांच्या मलमूत्रापासून (silkworm excrement) बायोइथेनॉल आणि बायोहायड्रोजन तयार करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. याबाबत सीएसआरटीआयचे संचालक एस. गांधी डोस यांनी सांगितले की, संस्थेतील शास्त्रज्ञांचे एक पथक सध्या या प्रकल्पावर काम करत आहे. आम्हाला प्रयोगशाळेकडून निष्कर्षांची प्रतीक्षा आहे.

म्हैसूरमधील सीएसआरटीआयच्या प्रयोगशाळांमध्ये एप्रिल २०२३ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. इथेनॉलच्या उत्पादनावरील प्रयोगांचे चांगले परिणाम दिसून आले. बायोहायड्रोजनच्या निर्मितीबाबत अभ्यास चालू आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पेट्रोलमध्ये बायोइथेनॉलचे मिश्रण वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर सीएसआरटीआयचा हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही दशकांपासून पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढत आहे. यास वाहतूक आणि औद्योगिक प्रक्रियेसाठी जीवाश्म इंधनाचे ज्वलनाच्या घटक कारणीभूत आहेत.

‘द हिंदू’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रेशीम कीटकांच्या संगोपनावेळी अळ्या तुतीची पाने खातात आणि कोंब आणि कचरा मागे सोडतात. सध्या, भारतात दरवर्षी १० लाख टनांहून अधिक तुतीच्या कोंबांचे आणि काही हजार टन रेशीम किड्यांच्या कचऱ्याचे उत्पादन होते. सीएसआरटीआयचे शास्त्रज्ञ डॉ. येरुवा थिरुपथिया यांनी सांगितले की, तुतीच्या कोंबांमध्ये आणि रेशीम किड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक सेल्युलोज असते, जो बायोरिफायनरीच्या उत्पादनासाठी कच्चा माल आहे. रेशीम शेतीतील टाकाऊ अवशेषांचा २जी सेकंड जनरेशन बायोइथेनॉल आणि बायोहायड्रोजन निर्मितीसाठी वापर करणे हा एक चांगला पर्याय आहे.

डॉ. तिरुपथिया म्हणाले, बायोहायड्रोजन हे बायोइथेनॉलपेक्षा अधिक आकर्षक पर्यायी अक्षय्य इंधन मानले जाते. त्याच्या ज्वलनामुळे हरितगृह वायूंऐवजी पाणी निर्माण होते. रेशीम कचऱ्यापासून बायोइथेनॉल आणि बायोहायड्रोजनचे उत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे आढळल्यास, सीएसआरटीआय प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक स्तरावर उत्पादनासाठी उद्योगांशी सहकार्य करण्याची योजना आखत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here