बेंगळुरू : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेवून उसाचा योग्य आणि लाभदायी दर (FRP) वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावा अशी विनंती त्यांना केली. मुख्यमंत्री बोम्मई यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच साखर कारखानदारांसोबत बैठक बोलावली जाईल असे निर्देश दिले.
कर्नाटकमधील ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांता कुमार यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. शांता कुमार यांनी सांगितले की, सध्या उत्तर प्रदेशमध्ये ऊसाची एफआरपी प्रती टन ३५०० रुपये आहे. पंजाबमध्ये ३,८०० रुपये आणि गुजरातमध्ये ४,४०० रुपये एफआरपी दिली जाते. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन खर्च खूप वाढला आहे. शांताकुमार यांनी सांगितले की, ऊसाच्या उत्पादनांपासून होणारा नफा शेतकऱ्यांना दिला जात नाही. राज्यातील किमान ३५ कारखाने इथेनॉलचे उत्पादन करीत आहेत. त्यापासून होणारा नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीत.