कर्नाटक: ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र

बेंगळुरू : कर्नाटमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चात २० टक्के वाढ झाल्याचा दावा करत उसाला प्रती टन ५,५०० रुपये एफआरपी देण्याची मागणी केली आहे. धारवाडमध्ये उपायुक्त कार्यालय भवन परिसरात सोमवारपासून धरणे आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादकांनी बुधवारी आपले आंदोलन तीव्र केले. आता जेल भरो आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे (Karnataka Sugarcane Growers Association) प्रदेशाध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ऊसासाठी वैज्ञानिक एफआरपी (योग्य लाभदायी दर) देण्याची मागणी करत सोमवारी आंदोलन सुरू केले आहे. साखर तथा ऊस विकास मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी स्वरूपात जोपर्यंत देत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा उपायुक्त कार्यालय भवन परिसरात ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी दिला.

बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आवारात बैल आणले होते. त्यांना प्रवेशद्वाराच्या आत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. नंतर केवळ शेतकऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला. आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना शांता कुमार यांनी प्रती टन ५,५०० रुपये एफआरपी देण्याची मागणी केली. ते म्हणाले, उत्पादन खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. त्यांनी सरकारचा २,९०० रुपये प्रती टन ऊस दर अशास्त्रीय असल्याचे सांगितले. साखर कारखान्यांसोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या परिणामांच्या आधारावर त्यांनी सरकारकडून मंजूर प्रस्ताव तत्काळ लागू करण्याची मागणी केली. सरकार जर याप्रश्नी उदासीन राहिले तर जेल भरो आंदोलन करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहाणार नाही, असा इशारा शांताकुमार यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here