खंडाळा साखर कारखाना यंदा पूर्ण क्षमतेने चालवणार : आ. मकरंद पाटील

सातारा : किसन वीर व खंडाळा या कारखान्यांच्या मागील व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे कारखान्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. कदाचित या दोन्ही कारखान्यांचे लिलावही झाले असते. परंतु, सर्वांच्या साथीने हंगाम सुरू करू शकलो. गत हंगामातील त्रुटी यावेळी सुधारल्या जातील, अशी ग्वाही किसनवीर कारखान्याचे चेअरमन, आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

म्हावशी येथे खंडाळा कारखान्याच्या बॉयलरपूजन प्रसंगी ते बोलत होते. आ. मकरंद पाटील, अर्चना पाटील यांच्यासह शेतकरी दाम्पत्यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, ‘किसनवीर’चे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, उदय कबुले, नितीन भुरगडे-पाटील, ज्ञानदीप जिजाबा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. मकरंद पाटील म्हणाले की, किसनवीर आणि खंडाळा कारखान्यांचे मिळून प्रतिदिन बारा ते साडे बारा हजार मेट्रिक टन उसाची तोडणी होईल, असे करार केले आहे. खंडाळा आणि किसनवीर साखर कारखान्याने गेल्या हंगामातील एफआरपी दिली आहे. शेतकऱ्यांची विश्वासार्हता मिळवण्यास आमचे व्यवस्थापन यशस्वी ठरले आहे. खंडाळा कारखान्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने चालवला जाईल.

यावेळी खंडाळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, दत्तात्रय ढमाळ, अशोक गाढवे, नितीन भुरगुडे- पाटील, विष्णू तळेकर, किसन धायगुडे, रमेश धायगुडे, मोनिका मोरे, हेमलता ठोंबरे, भाऊसो गाढवे, शशिकांत पवार, भानुदास यादव, रामदास तळेकर, अॅड. गजेंद्र मुसळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here