बांगलादेशात ऊस क्षेत्र घटले; काय आहेत या मागची कारण?

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

ढाका (बांगलादेश) : चीनी मंडी

हवामानातील बदलांमुळे उसावर मोठ्या प्रमाणावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे बांगला देशात उसाचे  क्षेत्र घसरत आहे. रोगराईमुळे शेतकऱ्यांनी उसाकडे पाठ फिरवल्याची परिस्थिती आहे. ऊस पट्ट्यातील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतखिरा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जवळपास संपुष्टात आल्याचे दिसत आहे. गेल्या वीस वर्षांत येथील ऊस शेती ९७ टक्क्यांनी कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

सतखिरा जिल्ह्यात केवळ हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांनी ऊसाकडे नाक मुरडले आहे. कृषि विभागाच्या निरिक्षणानुसार २००० सालापासून जिल्ह्यातील उसावर रोगराई येण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील शेतजमीन क्षारयुक्त होऊ लागल्यामुळे ऊस, हळद, डाळी आणि सूर्यफुलाच्या शेतीमध्ये अडथळा येऊ लागला आहे. त्यामुळे उसावर वेगवेगळ्या रोगांचा सातत्याने प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे आता ऊस शेती बंद केल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, कृषि विभागाच्या स्थानिक कार्यालयानेही या परिस्थितीविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील ऊस क्षेत्र कमी झाले आहे. पण, केवळ हवामानातील बदलांमुळे नाही तर, जिल्ह्यात साखर कारखानाही नाही. तसेच या पिकांसाठी शेतजमीन एक वर्षभर अडकून राहत असल्यामुळेही शेतकऱ्यांनी उसाला नापंती दिल्याचे कृषि विभागाचे म्हणणे आहे.

कृषि विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात दोन दशके मोठ्या प्रमाणावर ऊस शेती होत होती. १९९० मध्ये जिल्ह्यातील ५ हजार २५० हेक्टरवर ऊस शेती होत होती. त्यानंतर २००० मध्ये ३ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होती. त्यानंतर २०१० मध्ये ऊस क्षेत्र १४० हेक्टवर आले. यावर्षी ऊस क्षेत्र १२९ हेक्टरवर आले. २००० पासून आतापर्यंत ९७.२२ टक्के ऊस क्षेत्र घटले आहे.

सतखिरा जिल्ह्यातील कृषि विभागाचे सह संचालक अरबिंदा बिस्वास म्हणाले, ‘मुळात हवामान बदलामुळेच ऊस क्षेत्र घटत आहे असे नाही. जिल्ह्यात साखर कारखानाच नसल्यामुळे शेतकरी ऊस करण्यास तयार नाहीत. ऊस शेतीमध्ये वर्षभर शेती अडकून राहते. दुसरीकडे शेतकरी एका वर्षात तीन पिके घेऊन फायदा मिळवू शकतात. उसावरील रोगराई संदर्भात शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दतपूर गावातील ज्येष्ठ शेतकरी अब्दुल अझिझ म्हणाले, गावातील ७० ते ८० टक्के शेतकरी अनेकवर्षे ऊस शेती करत होते. मी देखील जवळपास ३५ वर्षे ऊस शेती करत होतो. पण, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मी ऊस शेती करत नाही.’

या परिसराला २००७ मध्ये सिदर आणि २००९ मध्ये अलिया चक्रिवादळाचा तडाखा बसला. त्यानंतर शेतकऱ्यांना हवी तशी पिके मिळेना झाली आहेत. जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढले आहे. त्यावर अझिझ म्हणाले, उसावर गेल्या काही वर्षांत कीड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बुरशी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळेच आम्ही ऊस शेती न करण्याचा निर्णय घेतला. तसेच उसामुळे शेतकऱ्यांना हातात पैसे मिळण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागते. आता तेवढ्या कालावधीत इतर पिके घेऊन पैसे मिळवू शकतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी ऊस शेतीला नकार देत आहेत.’

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here