ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई: व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात दोषी ठरलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कोचर यांची एकूण 78 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये त्यांचे मुंबईतले घर आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे.

व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या वादग्रस्त कर्जप्रकरणामुळे विविध चौकशींच्या फेऱ्यात सापडलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची तीस जानेवारी २०१९ला पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. संशयास्पद कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बँकेच्या लेखापाल समितीने नेमलेल्या श्रीकृष्ण समितीने सादर केलेल्या अहवालाअंती ही कारवाई करण्यात आली होती. या कर्ज प्रकरणात कोचर यांनी बँकेचे नियम तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा ठपका या समितीने त्यांच्यावर ठेवला. हा अहवाल प्राप्त होताच आयसीआयसीआय बँकेने एक पत्रक प्रसिद्ध करून चंदा कोचर यांची सीईओपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यांच्याविरोधात ही चौकशी सुरू झाल्यानंतर बँकेने त्यांना सक्तीच्या रजेवर धाडले होते.

चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज समितीवर असताना २०१२मध्ये व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. कोचर यांचे पती दीपक यांनी स्थापन केलेल्या न्यूपॉवर रीनीवेबल्स या कंपनीमध्ये व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी भरीव गुंतवणूक केली होती. सीबीआयने या प्रकरणी कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here