जवाहर कारखान्याने घेतली कष्टकऱ्यांबरोबरच जनावरांचीही जबाबदारी

हुपरी (कोल्हापूर ) : येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर याठिकाणी राज्याच्या विविध भागातून आलेले पाच
हजार ऊसतोड कामगार आहेत. कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शना खाली सर्व कामगारांना कारखान्याच्यावतीने आवश्यक जीवनावश्यक साहित्य पुरविले जात आहे. या प्रश्नी राज्य शासन मार्ग काढेल, असा विश्वासही आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. जोपर्यंत हे सर्व ऊसतोड कामगार कारखान्यावर असतील तोपर्यंत त्यांची व त्यांच्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.

आज आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखाना कार्यस्थळी जावून या ऊसतोड कामगारांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करताना ऊसतोड कामगारांनी आपल्या व्यथा मांडतानाच घरी जाण्यासाठी मार्ग काढावा आणि आमची रवानगी करावी अशी विनंती केली. यावेळी कारखान्याचे केन कमिटी चेअरमन राहुल आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, शेती अधिकारी किरण कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी दूरध्वनीवरुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली. सद्य स्थितीला जवाहर कारखाना कार्यस्थळी साडेपाच हजार
कामगार आहेत. त्या सर्वांना आपल्या घराकडे जाण्याची आशा लागली असून ते वारंवार विनंती करत असल्याचे सांगून या प्रश्नी राज्य शासनाने काही तरी मार्ग काढावा अशी विनंती केली. त्यावर मंत्री मुंडे यांनी राज्याच्या कॅबिनेट बैठकीत यावर निश्चितपणे मार्ग काढू अशी ग्वाही दिली.

शासनाच्या आदेशानुसार सर्व कामगारांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था कारखान्याच्यावतीने करण्यात आली आहे. तर जवळपास 2700 जनावरे असून त्यांच्याही चाऱ्याची व्यवस्था कारखान्याने करुन दिली आहे. आजअखेर यासाठी कारखान्याने 75 लाख रुपये खर्च केले असून कोणत्या ऊसतोड कामगाराला कमतरता भासू दिलेली नाही, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here