कोल्हापूर: साखर कारखाना निवडणुकीत पाटील आणि महाडिक आमने-सामने

कोल्हापूर : जिल्ह्यातील काँग्रेसचे बलाढ्य नेते, आमदार सतेज पाटील आणि विधानपरिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन कुटूंबांदरम्यान पुन्हा एकदा लढाई रंगल्याचे दिसून येत आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघांनी सोमवारी परस्परांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. राजाराम साखर कारखाना गेली २५ वर्षे माजी आमदार महाडिक यांच्या ताब्यात आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे या कारखान्यात विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवारांनी सोमवारी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी दावा केला की, त्यांचे पॅनेल सर्व जागांवर विजयी होईल आणि महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनल सत्तेबाहेर जाईल. पाटील यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांमध्ये महाडिक यांनी को-जनरेशन प्लांट स्थापन करण्याबाबत कधीही विचार केला नाही. मात्र, आता ते पुढील पाच वर्षात त्याची उभारणी करण्याचे आश्वासन देत आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांना नेहमीच कमी ऊस दर दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. इतर सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत जवळपास २०० ते ३०० रुपये प्रती टन कमी दर दिला गेला आहे, असा दावा पाटील यांनी केला.महादेवराव महाडिक यांनी आतापर्यंत यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यांचा मुलगा आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी या आरोपांचे खंडन केले. त्यांनी सतेज पाटील यांच्या डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना राजाराम साखर कारखाना आणि डी. वाय. पाटील साखर कारखान्यावर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी समोरा-समोर येण्याचे आव्हान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here