कोल्हापूर : तीन साखर कारखान्यांच्या निवडणूक खर्चाचे विवरण पत्र सादर

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणुका झालेल्या पाच साखर कारखान्यांपैकी कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना (कुडित्रे), भोगावती सहकारी साखर कारखाना आणि श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना (कसबा बावडा) यांच्या अंतिम निवडणूक खर्च तपशील विवरणपत्र प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सादर झाले आहे. तर बिद्री कारखाना आणि आजरा साखर कारखान्याकडून अद्याप विवरण सादर करण्यात आलेले नाही. उपलब्ध माहितीनुसार, कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक ४८ लाख ५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.

कुंभी कासारी कारखान्यापाठोपाठ भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ४६ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा खर्च २९ लाख ८९ हजार रुपये दाखविण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे ही विवरणपत्रे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियमांनुसार असलेल्या निवडणूक निधी मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे दिसून येत आहे. कुंभी कारखान्याचा निवडणूक खर्च प्राधिकरणाच्या मर्यादेपेक्षा ४८ टक्के जादा झाला आहे. भोगावती कारखान्याचा ३४ टक्के जादा तर राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा खर्च ५३ टक्के जादा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, विवरणपत्रे मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवली आहेत, असे प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here