कोल्हापुरातील खरीप पीक नुकसानीचे पंचनामे सुरू – वाकुरे

चिनी मंडी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उसासह खरीप पिके अडचणीत आली आहेत. सारख्या पडणाऱ्या पावसामुळे व पुराच्या पाण्यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. याबाबतचे पंचनामे सुरू केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

गेल्या पंधरवड्यापासून कोल्हापूरच्या पश्‍चिम भागातील तालुक्यांमध्ये अतिपावसाने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अनुकूल हवामानामुळे भात, ऊस व अन्य पिकांवरही रोग किडींचा प्रादुर्भाव होत आहे. याच गोष्टीची दखल घेऊन कृषी विभागाने महसूल विभागाच्या सहाय्याने पंचनामे सुरू केले आहेत. कीड रोगाने नुकसान झालेली पिके व पुराने बाधित पिके याबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे असे श्री. वाकुरे यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त गावांची माहिती गावपातळीवरील पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्यामार्फत मागविण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत आमचे कर्मचारी प्रत्यक्षात जाऊन नुकसानीचे पंचनाम्याचे काम पूर्ण करतील, याचबरोबर तहसीलदार पातळीवरूनही प्रयत्न सुरू असल्याचे श्री. वाकुरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात यावेळी वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून नद्या दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्या आहेत. संततधार पावसामुळे पिकांची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, भात यांसह बहुतांश पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी देखील खासदार धनंजय महाडिक यांनी मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केली. तसेच शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी श्री. पाटील यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here