कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय उसाची तोड घेऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करूनच ऊस तोडणी करावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी चिंचवाड (ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे टायर फोडले. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे शिरोळ तालुक्यातील ऊस वाहतूकदारामध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळात ऊसदराचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथे हाळ भागात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फोडण्यात आले. यात सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत रमेश जिंत्राप्पा खरोसे (रा. कुरुंदवाड) यांनी शिरोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. हुपरी येथील कारखान्यासाठी चिंचवाड येथून ऊस भरून हा ट्रॅक्टर निघाला होता. ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री या ट्रॅक्टरचे टायर फोडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदेमध्ये गेल्या गळीत हंगामाचा २०० रुपये अंतिम हप्ता व नव्या गळीत हंगामासाठी ३७०० रुपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती. त्यावर अद्याप काहीच चर्चा झालेली नाही. साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक घेऊन मार्ग काढावा अशी मागणी करण्यात येत आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.