कोल्हापूर : उसाला ४०० रूपयांचा दुसरा हप्ता देण्यास कारखानदारांचा नकार, बैठक निष्फळ

कोल्हापूर : गेल्या हंगामातील उसाला ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीत साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादकांना उत्पन्न वाटप सूत्रानुसार (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉम्युला-आरएसएफ) पैसे देवू असे सांगत ४०० रूपये देण्यास नकारघंटा वाजवली.

बैठकीला जिल्हाधिकारी राहूल रेखावार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे, उपसंचालक जी. जी. मावळे, साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीकडे  जिल्ह्यातील अनेक चेअरमन यांनी पाठ फिरविल्याने साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या भुमिकेत असल्याचे दिसू लागले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, कृषी मुल्य आयोगाने एफआरपीमध्ये केलेली वाढ ही चुकीची असून यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. शेतक-यांची एक टक्का रिकव्हरी इथेनॅालसाठी घेतल्यानंतर ३०७ रूपये शेतक-यांना दिले जातात, मात्र यामधून कारखान्यांना  जादा पैसे मिळतात. वारवांर आंदोलने करून जर पैसे मिळत नसतील तर मोठा संघर्ष सुरू होईल.

शेट्टी म्हणाले, आतापर्यंत राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. पेक्षा जादा दर दिलेले आहेत.  जिल्ह्यातील साखर कारखाने सक्षम असून ऊस दर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. शेट्टी यांनी संघर्षाशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसेल तर ४०० रूपयांसाठी साखर रोखण्याचे आंदोलन आणखी तीव्र करू एक कणही साखर बाहेर सोडणार नाही, असा इशारा दिला.

शेट्टी म्हणाले,  एफआरपी देवूनही कारखानदारांकडे पैसे शिल्लक आहेत. आता शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. यामुळे ४०० रूपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी मोर्चा काढला, निवेदने दिली, तरीही कारखानदार काहीही बोलायला तयार नाहीत. म्हणून साखर अडवण्याचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत आम्ही कायद्याचा आदर करून आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत. कारखानदार पैसेच देणार नसतील तर प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक, ‘स्वभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष  प्रा. डॅा. जालंदर पाटील,  सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सागर शंभुशेटे, विक्रम पाटील, राम शिंदे, शैलेश आडके यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here