गोदाम पूर्ण भरल्याने उघड्यावरच थप्पी : कारखानदारांची चिंता वाढली
कोल्हापूर, 25 मे 2018 : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सहाशे कोटी रुपयांची साखर कारखान्याबाहेर उघड्यावरच थप्पी मारून ठेवली आहे. गोदाम पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आणि चांगल्या दराअभावी वेळत विक्री होत नसल्याने ही साखर उघड्यावरच धोका पत्करून ठेवावी लागत आहे. यावर्षी झालेली अतिरिक्त साखर ठेवायची कुठ, अशीही मोठी समस्या कारखान्यांसमोर आहे.
जिल्ह्यात 21 साखर कारखाने आहेत. यामध्ये बहुसंख्य कारखान्यांची प्रत्येकी सुमारे 50 हजार क्विंटल ते 1 लाख क्विंटलपर्यंतची साखर कारखान्याबाहेरच थप्पी लावून ठेवावी लागली आहे. प्रत्येक वर्षी अशी साखर ठेवली जाते. पण, ही सर्व साखर पावसाळ्यापूर्वी विक्री होते. यावर्षी मात्र हे चित्र बदलले आहे. अतिरिक्त साखरेचे विक्री अद्यापही झालेली नाही. त्यामुळे पाऊस सुरू होण्याआधी ही सर्व साखर विक्री होईल का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पावसाळपूर्वी ही साखर विक्री न झाल्यास अनेक कारखान्यांची साखर पावसाने भिजण्याची शक्यता आहे. कारखान्यांकडून या साखरेची विशेष काळजी घेतली जाते. पण जोरदार पावसासमोर त्या टिकवा लागणे मुश्किल आहे.
यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीलचा मान्सून सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. साखर विक्री झाली तर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेही देता येणार आहे. यातच आता पावसाचे संकट समोर येत आहे. शेतकऱ्यांचे पैसे आणि मॉन्सूनचे आगमन अशा दुहेरी संकटाचा कारखानदारांना सामना करावा लागणार आहे. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील एका कारखान्याची कोट्यावधी रुपयांची साखर भिजली आहे. आता इतर कारखान्यांना याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.