कोल्हापूर : साखरेची शंभर कोटींची उलाढाल मंदावली, माल वाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, धान्य रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

गेले पाच दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी ‘चक्का जाम’मुळे कोल्हापुरातील बाजारपेठेसह उद्योगधंद्यांवरही काही अंशी परिणाम जाणवू लागला आहे. यात मार्केट यार्डच्या परिसरात येणाऱ्या मालट्रकवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने येथील आवक-जावक बंद झाली आहे; तर शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित वसाहतीमधील फौंड्री उद्योगावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे.

यात महत्त्वाचा घटक असलेले पिग आयर्न गोवा, होस्पेट, बेल्लारी, आदी ठिकाणांहून वाहतूकदारांच्या संपामुळे आलेले नाही. उपलब्ध असलेल्या साठा काही ठिकाणी संपत आला आहे; तर कोल्हापुरातील विविध साखर कारखान्यांतून राज्यासह देशात आयात व परदेशांत निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेची उलाढाल मंदावली आहे.
त्यानुसार १०० कोटींहून अधिक उलाढालींवर परिणाम झाला आहे.

विशेष म्हणजे कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद, केरळ, तमिळनाडू, गुजरात, आदी ठिकाणी जाणारी साखर गोदामामध्येच पडून आहे. दिवसाला ४०० ते ४५० ट्रक साखर कोल्हापुरातून बाहेर जाते. ही वाहतूक ठप्प झाली आहे. यासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानकडे जाणाऱ्या गुळाचीही हीच स्थिती आहे. आंदोलनाचा परिणाम आज, बुधवारपासून जाणवू शकतो, असे मत अनेक व्यापाऱ्यानी व्यक्त केले.

जयगड, मंगलोर बंदरांतून कोल्हापुरात येणाऱ्या एक हजार टन दगडी कोळशाची वाहतूक ठप्प झाली आहे. याचाही परिणाम फौंड्री उद्योगावर होत आहे. यासह बंगलोर, दिल्ली, तमिळनाडू, आदी ठिकाणांहून जिल्ह्यात येणारे विविध कंपन्यांच्या सिमेंटची वाहतूकही ठप्प झाली आहे.

दरम्यान वाहतूकदारांच्या मागण्या सरकारने मंगळवारपर्यंत मान्य न केल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, आदींची वाहतूक रोखली जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुखांची भेट घेत महामार्गावर ठिय्या आंदोलनासाठी परवानगी मागितली.

यासह खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही केली. यावेळी सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, प्रकाश भोसले, विजय भोसले, विजय पोवार, गोविंद पाटील, शिवाजी चौगुले, सतीश ढणाल, आदी उपस्थित होते.

खडीसाखरेचा पुरवठा कमी झाला

कोल्हापूर जिल्हा साखर उत्पादनाबरोबरच खांडसरी उद्योगही जगाच्या नकाशावर आहे. या खांडसरीमधून उत्पादित झालेली खडीसाखरही वाहतूकदारांच्या संपामुळे देशातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, शनीशिंगणापूर, नाशिक, तिरूपती, आदी ठिकाणी जाणाऱ्या खडीसाखरेचा पुरवठा कमी झाला आहे.

SOURCELokmat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here