ऊसाच्या कमतरतेमुळे गाळप हंगाम विस्कळीत

220

मुजफ्फरनगर : खतौलीमध्ये कोरोना महामारी आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका, उत्तर प्रदेशातील त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांमुळे उसाचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे गाळप हंगाम विस्कळीत झाला आहे. दररोज ऊसाच्या पुरवठ्यात घट होत आहे. त्यामुळे साखर उताराही घसरला आहे. साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने हंगाम मे महिन्याच्या मध्यावधी पर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कारखान्याने कोविड १९चे नियम पाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

साखर कारखान्याने यंदा उसाच्या उपलब्धतेची माहिती मोबाइल एसएमएसद्वारे दिली आहे. शेतकऱ्यांच्या मोबाइल क्रमांकावर उसाचे वजन, त्याची तारीख याची माहिती दिली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्रिस्तरीय निवडणुकांमुळे शेतकरी शेतात कमी वेळ येत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांकडे लांब अंतरावरून मजूर येतात. कोविड १९ महामारी पसरल्याने कामगार आपापल्या घरांकडे परतले आहेत. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पश्चिम बंगालमधील कामगार होते. ते निवडणूकीमुळे परत गेले. सध्या गव्हाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी गहू, मोहरीची काढणी करत आहेत.

साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून पुरेसा ऊस गाळपास उपलब्ध नाही. कारखान्याची दररोजची गाळप क्षमता १ लाख ३९ हजार क्विंटल आहे. मात्र, आता फक्त १ लाख क्विंटल ऊस मिळत आहे. कारखान्याचा गळीत हंगाम मेच्या मध्यावधीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. सध्या एक क्विंटल उसापासून १३ टक्के साखर उतारा मिळत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here