माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी २०२३ हे वर्ष चांगले राहिलेले नाही. जागतिक मंदीच्या शक्यता आणि कोविड १९ महामारीमुळे या कंपन्यांसह इतर क्षेत्रातील कंपन्यांनी यापूर्वी कर्मचारी कपात केली होती. ही कपात २०२३ मध्येही सुरू राहिल अशी शक्यता आहे. कारण, अनेक टेक कंपन्यांनी जादा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांमध्ये मेटा, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, सेलफोर्ससह इतर कंपन्यांचा समावेश आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कन्सल्टिंग फर्म ग्रे अँड क्रिसमस इंकने २०२२ मध्ये जागतिक स्तरावर टेक कंपन्यांकडून एकूण ८०,९७८ कर्मचाऱ्यांपैकी ५२,७११ जणांना काढून टाकण्यात येईल अशी घोषणा केली होती. वर्ष २००० पासून कोणत्याही एका इंडस्ट्रिजमध्ये एका महिन्यात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कपात आहे. याशिवाय अलिकडेच अमेझॉन, मायक्रोसॉफ्टने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची तयारी केली आहे. कंपन्यांनी २०२० मध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. त्यामुळे कंपन्यांच्या खर्चात बचत झाली होती. शिवाय नफाही वाढला. शेअर्समध्येही वाढ झाली होती. मात्र, आता कंपन्या तोट्यात जावू लागल्याने कर्मचारी कपात सुरू करण्यात आली आहे.