नॅचरल शुगरच्या गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचा शुभारंभ : बी. बी. ठोंबरे

उस्मानाबाद : रांजणी (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि, मध्ये गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली. कृषिरत्न बी. बी. ठोंबरे म्हणाले की, हवामान बदलातील पर्यावरण असंतुलनाबरोबरच विषारी रसायन युक्त अन्नधान्यामुळे मानवी जीवन अत्यंत धोक्यात आलेले आहे. ‘‘पर्यावरण संतुलीत विकास व विषमुक्त अन्न’’ हे ध्येय उराशी बाळगून 22 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेल्या नॅचरल परिवाराने पर्यावरण संतुलित विकास तर यापूर्वीच साधलेला आहे. मात्र विषमुक्त अन्न ही संकल्पना मूर्त स्वरूपात आनण्यात नॅचरल परिवारास आता 100 टक्के यश मिळालेले आहे.

ते म्हणाले, चालू गळीत हंगामापासून 100 टक्के गंधक व ईतर रसायन मुक्त (सल्फर व केमिकल फ्री) साखर निर्मितीस सुरूवात झालेली आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गंधक व केमिकल विरहीत साखरेचेच उत्पादन व सेवन केले जाते. साखर हा मानवी आहारातील अत्यावश्यक घटक असून तो मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यादृष्टीने नॅचरल शुगरने गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून प्रकल्पाची सुरूवात केली व आज महत्प्रयासानंतर व अनेक संशोधनानंतर हे स्वप्न वास्तवात साकार झाले.

ठोंबरे म्हणाले कि, चालू गळीत हंगाम 2023-24 पासून नॅचरल शुगरमध्ये साखर उत्पादन प्रक्रियेत गंधक व कोणत्याही घातक् रसायनाचा वापर न करता ऑरगॅनिक एंझाईम्सचा वापर करून व यंत्र सामुग्रीमध्ये अत्याधुनीक बदल करून 100 टक्के गंधक विरहीत साखर उत्पादनाची सुरूवात झाली आहे. त्यानुसार चालू हंगामासह यापुढे कायमस्वरूपी नॅचरल शुगर गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीमध्ये अग्रेसर राहील.गंधक व रसायनमुक्त उत्पादीत पहिल्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. साखर पोते पुजनास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, ऊस उत्पादक शेतकरी, जनरल मॅनेजर यु.डी.दिवेकर व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here