आरबीआयकडून इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द

मुंबई : रिझर्व बँकेने (आरबीआय) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे.

कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड,इचलकरंजी कोल्हापूर ही येत्या ४ डिसेंबर २०२३ पासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालत आहे, असे म्हणण्यात आले आहे.

बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास ग्राहकांवर विपरित परिणाम होईल, असे पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, या बँकेमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशाचा संदर्भात देखील त्यांनी पत्रकात माहिती दिली असून बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते.

DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सब्सिडिरी आहे. जी ५ लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील, असे ही म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here