लखनौ : उत्तर प्रदेशात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक शहरे तसेच तालुके जनमग्न झाल्याची स्थिती आहे. शुक्रवारी जोरदार पाऊस कोसळल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारसाठीही अलर्ट जारी केला. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, युपी-एनसीआरमध्ये शुक्रवारीही पाऊस पडला. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे नोएडा, इटावा, मेरठ, फरुखाबाद, सीतापूर, उन्नाव, अलीगढमध्ये शनिवारी पहिली ते आठवीच्या सर्व शाळा बंद राहतील. शुक्रवारी पावसामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली होती. यांदरम्यान हवामानशास्त्र विभागाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. नोएडा आणि आसपासच्या भागात पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गौतम बुद्ध नगर जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी साठले होते. याशिवाय सरकारी इमारती, न्यायालयातही पाणी भरले. दरम्यान प्रयागराजमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. हमीरपूरमध्ये आतापर्यंत ५०० घरे कोसळली आहेत. नॅशनल हायवेवर नुकसानभरपाई मागण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले.तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली.