मलावीत भारताच्या मदतीने उभारलेल्या सलीमा साखर कारखान्यात स्थानिक ४,००० जणांना मिळाला रोजगार

लिलोंग्वे/नवी दिल्ली : भारताने दिलेल्या कर्ज रुपी मदतीअंतर्गत (Line of Credit assistance) दक्षिण पूर्व आफ्रिकेतील देश मलावीमध्ये उभारण्यात आलेल्या सलीमा साखर कारखान्याच्या माध्यमातून ४,००० हून अधिक स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे. हा कारखाना मलावी येथील एकूण साखरेच्या गरजेपैकी १५ टक्के पुरवठा करतो. विदेश राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशाच्या दौऱ्यात कारखान्याची पाहणी केली.

साखर कारखान्याच्या उभारणीसाठी ३३.६४ मिलियन अमेरिकन डॉलरचे कर्ज मदतीच्या रुपात देण्यात आले आहे. कारखआन्याची निर्मिती मार्च २०१३ मध्ये सुरू करण्यात आली होती. हे काम ऑक्टोबर २०१५ मध्ये पूर्ण झाले आहे. हा कारखाना अधिकृतरित्या १५ ऑगस्ट २०१६ रोजी मलावीचे राष्ट्रपती आर्थर पीटर मुथारिकाद्वारा कार्यान्वीत करण्यात आला होता. कारखाना राजधानी लिलोंग्वेपासून १०० किमी दूर सलीमा येथे आहे.

सलीमा कारखान्याची प्रतीदिन ऊस गाळप क्षमता १,२५० मेट्रिक टन आहे. मलावी सरकारकडे कंपनीचे ४० टक्के शेअर आहेत. तर ६० टक्के शेअर याचे प्रमोटर, गुजरातमधील भारतीय कंपनी ओम शुगर लिमिटेडकडे आहेत. कंपनीकडे जवळपास ४,००० हेक्टर जमीन आहे आणि सद्यस्थितीत १,००० हेक्टर जमिनीवर शेती केली जात आहे. शेती आणि कारखाना मलावी नदीच्या लगत आहेत. ही आफ्रिकेतील द्वितीय क्रमांकाची मोठी नदी आहे. उसाचे पिक घेण्यासाठी ठिबक सिंचन, सुक्ष्म सिंचनाचा वापर केला जातो. सलीमा साखर कारखाना स्वतः उसाचे उत्पादन करतो. शिवाय छोट्या शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here