मुंबई : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांसह बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी नागपूरमध्येही १५ ते २१ मार्च या कालावधीत लॉकडाउन लागू करण्यात आला.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या लॉकडाउनमध्ये विवाह समारंभाचे हॉल, हॉटेल्स, रेस्तराँ बंद राहतील. याशिवाय सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी कार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना शक्य असेल तेथे वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. मात्र, या कालावधीत दूध, औषधे, भाजीपाला, रेशन अशा गरजेच्या वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी राज्यभरात २८००० हून अधिक नवे रुग्ण आढळले. याशिवाय १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५३,५८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत अनेक राज्यांत नाइट कर्फ्यू, निर्बंध
महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर आदेश लागू करताना म्हटले होते की, सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. महाराष्ट्रासह गुजरातमधील ४ शहरांतही नाइट कर्फ्यू आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थानातील काही शहरांत निर्बंध कडक केले आहेत. पंजाबमधील १२ जिल्ह्यांमध्ये सरकारने नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. याशिवाय, दिवसभरात एक तास वाहनांना थांबविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

















