मध्य प्रदेश: कोविड १९ संक्रमणामुळे भोपाळ, इंदौरमध्ये नाइट कर्फ्यू, ८ शहरांत नियम कडक

122

भोपाळ : मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे राजधान भोपाळ तसेच इंदौरमध्ये बुधवारपासून नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय अन्य आठ शहरांमध्येही रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बाजार बंद राहील.

मध्य प्रदेश जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये कोविड १९ बाबत आढावा घेण्यात आला. याबाबत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजेश राजौरा यांनी निर्देश दिले आहेत.
मध्य प्रदेशात मंगळवारी कोरोना संक्रमित नवे ८१७ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या २,७०,२०८ वर पोहोचली आहे. राज्यात एकूण मृतांची संख्या ३८९१ झाली असून मंगळवारी इंदौरमध्ये नवे २६४ रुग्ण आढळले. तर भोपाळमध्ये १९६ रुग्ण आढळले आहेत. २,६१०३१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ५२८६ जणांवर उपचार सुरू आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे इंदौर तसेच भोपाळमध्ये नाइट कर्फ्यू असेल. याशिवाय जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, रतलाम, छिंदवाड़ा, बुरहानपूर, बैतूल तसेच खरगोनमध्येही बुधवार रात्री १० वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने तसेच इतर व्यवसायिक संस्था बंद राहतील. पुढील आदेशापर्यंत ही कार्यवाही लागू असेल. या शहरांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. औषध दुकाने, खाद्यपदार्थ, धान्य दुकानांना हे निर्बंध नाहीत. अत्यावश्यक सेवा, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्टँड येथे ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा प्रवाशांना एक आठवडा घरीच रहावे लागेल. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे नवे १७८६४ रुग्ण सापडले. तर ८७ जणांचा मृत्यू झाला. सध्या १,३८,८१३ जणांवर उपचार सुरू आहेत.

होळीच्या कार्यक्रमांवर प्रतिबंध
भोपाल, इंदौर, जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, रतलाम, छिंदवाड़ा, बुरहानपुर, बैतूल आणि खरगोन जिल्ह्यांमध्ये होळीच्या वेळी आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. या जिल्ह्यांत शंभरपेक्षा जास्त लोकांच्या सहभागाने खुल्या मैदानांवर आयोजित सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांना जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here