महाविकास आघाडी सरकारने उसाच्या एफआरपीचा कायदा मोडित काढला : माजी खासदार राजू शेट्टी

पुणे : शेतकरी चळवळ हा माझा आत्मा आहे.मी कष्टकऱ्यांमागे सावलीप्रमाणे राहणार आहे. त्यांच्या न्याय प्रश्नासाठी सदैव लढत राहिन.आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, काय चुकलं यावर मंथन करून पुढील राजकीय दिशा ठरवू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. बारामती येथे ‘स्वाभिमानी’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सतीश काकडे होते.

राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे अयोग्य आहेत.शेतीसाठी दिवसा विजेची मागणी पूर्ण होण्याची गरज आहे.महाविकास आघाडी सरकारने उसाच्या एफआरपीचा कायदा मोडित काढला.भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवला गेला आहे. उसाची हजारो कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. सोयाबीन, कापसाला आणि शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी विकासाच्या नावाखाली लुटल्या जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात २३ जूनच्या सत्रात घेऊ. राज्यभरातील शेतकरी चळवळ अधिक जोमाने पुढे चालवू. मी न थकणारा आहे, चळवळ चालूच राहिल. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, संदीप जगताप, प्रकाश पोपळे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, प्रकाश बालवाडकर, अनिल पवार, अमर कदम, दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रशांत डिक्कर, प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here