महाराष्ट्र : ३० साखर कारखान्यांनी आकारला प्रती टन एक हजारापेक्षा अधिक ऊस तोडणी, वाहतूक दर

पुणे : उसाची खरेदी करताना कायद्यानुसार, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष साखर कारखान्यांच्या दारात ऊस नेऊन देण्याचे बंधन आहे. उत्तर भारतात शेतकरी स्वतः ऊस तोडणी, वाहतूक करीत ऊस थेट कारखान्यापर्यंत आणून देतात. महाराष्ट्रात मात्र तोडणी व वाहतूक प्रत्यक्ष शेतकरी करीत नसून कारखानेच ही कामे करतात. त्यामुळे याचा खर्च एफआरपीच्या रकमेतून कापून घेतला जातो. राज्यातील ऊस उत्पादकांना उत्सुकता लागलेले ऊस तोडणी व वाहतुकीचे दर साखर आयुक्तालयाने जाहीर केले आहेत. गेल्या हंगामात २०८ पैकी ३० साखर कारखान्यांनी प्रती टन १,००० रुपयांपेक्षा अधिक दर आकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘ऍग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, काही कारखाने यासाठी भरमसाठ रकमा घेतात. पूर्वी कोणत्या कारखान्याने नेमक्या किती रकमा कापल्या हे गोपनीय ठेवले जात होते. आता साखर आयुक्तालयाने स्वतःच तोडणी व वाहतूक दर घोषित करण्याची आदर्श पद्धत सुरू केली आहे. राज्यात गेल्या गाळप हंगामात (२०२३-२४) २०८ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. सर्वाधिक तोडणी व वाहतूक खर्च आकारणाऱ्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये एस. जे. शुगर ( रावळगाव, जि. नाशिक) हा कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या एफआरपीतून तोडणी व वाहतूक खर्चापोटी प्रतिटन १३३४.९८ रुपये कापून घेतले आहेत.

सर्वांत कमी तोडणी व वाहतूक खर्च आकारणारा कारखाना म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूरच्या मानस अॅग्रोने ११९३.६३ रुपये, पुसदच्या भैरवनाथ शुगरने १५५९.१५ रुपये, पारनेरच्या सोपानराव धसाळ ऍग्रो, माळकुपने ११०३.०१ रुपये, जळगावच्या संत मुक्ताई शुगर, घोडसगावने १०९६.७९ रुपये, तर संगमनेरच्या गजानन महाराज शुगरने १०९५.९७ रुपये कपात केले आहेत. वाळकी-अहिल्यानगरच्या पीयूष शुगरने १०८२.९७ रुपये, मौदा-नागपूरच्या व्यंकटेश्वर पॉवरने १०७९ रुपये, उत्तर सोलापूरमधील सिद्धनाथ शुगरने १०७५.५५ रुपये आणि बारामती अॅग्रोने १०७३.१० रुपये आकारले आहेत.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here