महाराष्ट्र : राज्यातील ९५ टक्के साखर कारखाने बंद, अवघे ११ कारखाने सुरू

पुणे : राज्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे. साखर आयुक्तालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, १७ एप्रिलअखेर राज्यातील २०७ साखर कारखान्यांपैकी १९६ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. केवळ ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. गेल्या वर्षी, याच काळात सर्व कारखान्यांनी गाळप थांबवले होते. तुलनेने यंदा गाळप हंगाम जास्त दिवस चालला आहे. राज्यातील साखरेचे उत्पादन यंदाच्या हंगामात वाढले असून देशातील साखर उत्पादन काहीसे कमी झाल्याचे चित्र आहे.

सध्या राज्यात १ हजार ६६.८२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १ हजार ९३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी १ हजार ५३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते आणि १ हजार ५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा साखर आणि उसाचे उत्पादनही वाढल्याचे चित्र आहे. साखर उतारा १०.२५ टक्के आहे. सध्या राज्यातील केवळ ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आगामी १० ते १२ दिवसांत राज्यातील गाळप हंगाम संपण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, यंदा कोल्हापूर विभागात सर्वाधिक २७९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून नागपूर विभागात सर्वात कमी ६.५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे देशांतर्गत साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here