मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून साखर निर्यात कोट्यामध्ये हस्तक्षेप करणे आणि वाणिज्य, ग्राहक संरक्षण आणि अन्न तथा सार्वजनिक व्यवहार मंत्रालयाला योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, साखरेबाबत सध्याचे खुले निर्यात धोरण (Open Export Policy) सुरू ठेवणे गरजेचे आहे.
मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, साखर निर्यातीबाबत सध्याच्या खुल्या धोरणामुळे भारताने २०२१-२२ मध्ये जगभात सर्वात मोठा साखर निर्यातदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थिरता मिळाली आणि परकीय चलनातही वाढ झाली. मात्र यावर्षीही खुल्या निर्यात पद्धतीऐवजी कोटा प्रणाली लागू केली जाणार आहे. त्यामुळे साखर कारखानदारांचे नुकसान होणार आहे. २०२१-२२ मध्ये कच्च्या तेलाच्या चढ्या किमती, ब्राझीलने साखरेएवजी इथेनॉल उत्पादनाकडे दिलेले लक्ष यातून साखर निर्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जर ब्राझीलने साखर उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले तर भारताचे नुकसान होईल. त्यामुळे राज्य सहकारी साखर कारखाना संघासह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघानेही खुले साखर निर्यात धोरण लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाला निर्देश दिले जावे.