मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखर उद्योाला ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणात वाढ झाल्याने हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, असे त्यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्लांटच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
धाराशिव साखर कारखान्याने राज्यात प्रथमच मेडिकल ऑक्सिजन उत्पादन सुरू केले आहे. कारखान्याने आपल्या इथेनॉल प्लांटचे रुपांतर ऑक्सिजन प्लांटमध्ये केले आहे. प्रतीदिन ९६ टक्के शुद्धतेने सहा टन ऑक्सिजन उत्पादन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची गरज व्यक्त केली. आपली उत्पादन क्षमता १२०० मेट्रिक टन प्रती दिन आहे. तर मागणी १७०० मेट्रिक टन आहे. जर आम्ही ३००० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले तर आम्ही आत्मनिर्भर होऊ शकतो. शहरांमध्ये ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा स्थितीत साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.












