पूरग्रस्तांसाठी नेते, राजकीय पक्षांकडून मदत; मंत्रिमंडळ देणार महिन्याचा पगार

मुंबई : सांगली, साताऱ्यासह कोल्हापूर जिल्ह्याला तडाखा दिलेल्या महापुराचे पाणी हळू हळू खाली उतरत असताना राज्याच्या विविध भागांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मराठी चित्रपट कलाकार, उद्योगपतींसह राजकीय पक्ष आणि नेतेमंडळीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री योगेश सागर, विद्या ठाकूर आणि विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम आपला पगार पूरग्रस्तांसाठी देत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्यासह मंत्रिमंडळाच्या पगाराची रक्कम पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच पुनर्वसनाच्या कामासाठी वापरली जाणार आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीदेखील पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मुंबई महापालिकेचे नगरसेवक, यांना महिन्याचा पगार किंवा पेन्शन रोख स्वरूपात पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले आहे. मुंबई काँग्रेसकडून पूरग्रस्तांसाठीच्या मदतीचे ट्रक लवकरच रवाना करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, रोख स्वरुपातही मदत गोळा करण्यात येत आहे.

हरमन फिंडोकेम लिमिटेड कंपनीने ५१ लाख, नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा मंडळाने अन्नाच्या पाकिटांसह वैद्यकीय मदत, सांगली आणि कोल्हापूरला पाठवली आहे. छत्रपती संभाजीराजे सहकार उद्योग समूहाने १०.५० लाख रुपये तर, अॅग्रीकल्चरल प्रोड्युस मार्केट कमिटीने ११ लाख, औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ युनियनने २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीने पूरग्रस्त भागातील गावे दत्तक घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजपच्या सर्व आमदारांना एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरला बसलेल्या पुराच्या तडाख्यात ४३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या जिल्ह्यांसोबतच पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पावसाने तडाखा दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here