पुणे : पावसाअभावी महाराष्ट्राचा साखर उद्योग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील दुष्काळजन्य स्थितीमुळे ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते आणि 2022-23 हंगामात राज्यातील कारखान्यांनी 10.5 दशलक्ष टन उत्पादन केले होते. मात्र यंदा ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) चे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे म्हणाले की, येणाऱ्या गाळप हंगामात साखर कारखान्यांना उसाचा मोठा तुटवडा जाणवू शकतो. ठोंबरे यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले की, ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला नाही. सप्टेंबरमध्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा होती, मात्र सप्टेंबरमध्येही फारसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातील ऊस वाळू लागला आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात 15 ते 18 टक्के घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरे आणि खांडसरीला पाठवत आहेत. जर राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी ऊस वाळून घालविण्याएवजी चाऱ्यासाठी विकू शकतात. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून गळीत हगाम सुरू करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत.