महाराष्ट्र : आगामी गळीत हंगामात, उच्चांकी १३८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

पुणे : महाराष्ट्रात आगामी साखर हंगामही उच्चांकी ठरेल असे अनुमान साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. सरासरी ९५ टन प्रती हेक्टर प्रमाणे उत्पादन गृहीत धरले असता हंगामासाठी एकूण १,४१३ लाख टन ऊस उपलब्ध असणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील ऊसाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून आले असून राज्यात सरासरी १०० लाख टन जादा ऊस उपलब्ध होणार आहे. आगामी साखर हंगामात १३८ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन होईल अशी शक्यता वर्तविण्यात आले आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीतून दिसून येते की, राज्यात इथेनॉलकडे १२ लाख टन साखर वळवली जाईल. सद्यस्थितीत राज्यातील ऊस क्षेत्र १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये एक हजार हेक्टरची वाढ झाली आहे. उपलब्ध उसापैकी ९५ टक्के ऊस गाळपास येईल या गृहितकानुसार, साखर कारखान्यांकडे १,३४३ लाख टन ऊस येईल. सरासरी ११.२० टक्के ऊताऱ्यानुसार १५० लाख टन एवढे विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्या आहे. यापैकी १२ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळेल. त्यानुसार राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाख टनाने साखर उत्पादन वाढणार आहे. एकूण उत्पादन १३८ लाख टनांच्या आसपास होईल, असे साखर आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

राज्यात यंदा बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ४९ हजार ५८१ हेक्टर असलेले ऊस क्षेत्र यंदा ८४ हजार २०८ हेक्टरवर गेले आहे. जालन्यामध्ये ३४ हजार ४३४ हेक्टरवरून हे क्षेत्र ४७ हजार २२७ हेक्टरवर पोहोचले आहे. सांगली जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र गतवर्षीच्या ९२ हजार ७१५ हेक्टरवरून १ लाख ७ हजार ५८५ हेक्टरवर पोहोचले आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यावरही राज्य सरकारने भर दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here