देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडीवर, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर


पुणे : 
महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2023 पासून गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कोल्हापूरसह सांगली आणि सतार जिल्ह्यात पहिले काही दिवस हंगाम अत्यंत संथगतीने सुरु होता. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून हंगामाला गती आली आहे. त्यामुळेच देशात ऊस गाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकून आघाडी घेतली आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले कि, ३० नोव्हेंबर अखेर देशातील साखर कारखान्यांनी ५११ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. तर आतापर्यंत ४३ लाख २० हजार टन साखर उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्रात १७२ लाख टन ऊस गाळप होऊन सर्वाधिक १३.५० लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

उत्तर प्रदेशातील १४४ लाख टन ऊस गाळप करून १३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. कर्नाटकने १३० लाख टन ऊस गाळप करून ११ लाख टन साखर उत्पादन करून तिसरे स्थान पटकावले. साखर उताऱ्यात मात्र उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशचा साखर उतारा ९.०५ टक्के आहे. कर्नाटकचा साखर उतारा ८.५० टक्के असून महाराष्ट्र ७.८५ टक्के साखर उताऱ्यासह तिसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अद्याप इथेनॉल खरेदी दरवाढीची अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादनावरून संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाशी पाठपुरावा केला आहे, असे दांडेगावकर म्हणाले. केंद्राकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर इथेनॉल उत्पादनाला आणखी गती येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here