महाराष्ट्र: ठाण्यातील ११ हॉटस्पॉटवर ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन, नाशिक आठवडाभर बंद

109

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण गतीने वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर नाशिक येथील लॉकडाउन आठवडा अखेरपर्यंत वाढविण्याच निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात १५ मार्चनंतर विवाह समारंभांना परवानगी देण्यात येणार नाही. ज्या विवाह समारंभांना आधी परवानगी मिळाली आहे, तेच समारंभ १५ मार्चपर्यंत होतील असे यावेळी ठरले.

याशिवाय मुंबईतही कोरोना फैलावला आहे. येथील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ८९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात कायदे कडक करण्यात आले आहेत. याचबरोबर ठाणे येथे ११ हॉटस्पॉट विभागांत १३ मार्चपासून ३१ मार्चअखेर लॉकडाउन असेल.

राज्य सरकारने मंगळवारपासून अनेक शहरांतील निर्बंध वाढवले आहेत. अत्यावश्यक साहित्य वगळता सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच खुली राहतील. हॉटेल्सना रात्री नऊ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थ होम डिलिव्हरीसाठी रात्री अकरा वाजेपर्यंत मुदत राहील. नशिक शहर, मालेगाव आणि जेथे कोरोना संक्रमण अधिक आहे, अशा ठिकाणी शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. मात्र, यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा नियोजनानुसारच होणार आहेत.

नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांत ३७२५ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. सोमवारी येथे ६४४ नवे रुग्ण आढळले. येथे आतापर्यंत १ लाख ३१ हजार ९९० कोरोना संक्रमित झाले आहेत. तर ठाणे शहर-जिल्ह्यात गेले आठवडाभर दररोज सरासरी ७०० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. येथे आतापर्यंत २ लाख ८६ हजार ३५१ जणांना कोरोना झाला आहे.
महाराष्ट्रात सलग तीन दिवस दररोज नवे १० हजार रुग्ण आढळले. मात्र, सोमवारी ही संख्या ८७४४ इतकी झाली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण २२२८४७१ रुग्ण झाले असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५२५०० पर्यंत पोहोचली आहे. तर २०,७७,११२ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या ९७,६३७ जणांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांकडून नियमांचे पालन न होणे, नागरिकांचे लोकलमधून प्रवास करणे आणि दुकाने, व्यवसायाला परवानगी दिल्यामुळे कोरोनाच्या संख्येत गतीने वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here