साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर

Image Credits: Livemint

सोलापूर: देशभरातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, देशात सुरू झालेल्या ५२३ साखर कारखान्यांपैकी १०६ साखर कारखाने बंद झाले आहेत. एकूणच साखर उत्पादन २५८ लाख ६० हजार मे.टन इतके झाले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम, उत्तर प्रदेश दुस-या तर कर्नाटक तिस-या क्रमांकावर आहे.

देशातील १२ राज्यात प्रामुख्याने साखर उत्पादन घेतले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील सर्वाधिक १८७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील ११९ व कर्नाटकमधील ६५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. सुरू झालेल्या एकूण ५२३ साखर कारखान्यांपैकी १५ मार्चपर्यंत १०६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. कारखाने बंद होण्यात कर्नाटक आघाडीवर असून सर्वाधिक ४८ कारखाने १५ मार्चपर्यंत बंद झाल्याची नोंद आहे.

त्यानंतर महाराष्ट्रतील ३१ कारखाने तर उत्तर प्रदेशातील ५ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. तामिळनाडूतील सुरू झालेल्या ३६ पैकी ९, आंध्रप्रदेश-तेलंगणामधील सुरू झालेल्या २५ पैकी ७, मध्यप्रदेशातील २२ पैकी एक, गुजरातमधील १७ पैकी २, उत्तराखंडमधील सुरू झालेल्या ७ पैकी एक कारखाना बंद झाला आहे. उर्वरित साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. सुरू झालेले बिहारमधील सर्वच १०, पंजाबमधील १६, हरियाणातील १४, राजस्थानमधील एक कारखाना सुरू आहे.

२५८ लाख मे.टन साखर उत्पादन
– देशभरात सुरू झालेल्या साखर कारखान्यातून १५ मार्चपर्यंत २५८ लाख मे.टन साखर तयार झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून ९३.८३ लाख मे.टन, उत्तरप्रदेशात ८४.३९ लाख मे.टन, कर्नाटकमध्ये ३५.१० लाख मे.टन, गुजरातमध्ये ९.१० लाख मे.टन, आंध्रप्रदेश- तेलंगणामध्ये ६.४० लाख मे.टन, पंजाब व बिहारमध्ये प्रत्येकी ५.८० लाख मे.टन, हरियाणामध्ये ५.२५ लाख मे.टन, मध्यप्रदेशमध्ये ४.५० लाख मे.टन, तामिळनाडूमध्ये ४.२० लाख मे.टन, उत्तराखंडमध्ये ३.२५ लाख मे.टन साखर उत्पादन झाले आहे.

मे महिन्यापर्यंत हंगाम
– महाराष्ट्रातीलल साखर हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल असे सांगण्यात आले. एप्रिलअखेरपर्यंत बहुतांशी साखर कारखाने ऊस संपल्याने बंद होतील; काही जिल्ह्यातील काही कारखाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील असा अंदाज आहे.

SOURCELokmat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here