महाराष्ट्र: राज्यातील 10 कारखान्यांचे 1,132 कोटींचे कर्जाचे प्रस्ताव NCDC कडे पाठवण्याची तयारी

पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) राज्य सरकारच्या हमीवर कर्ज मिळावे, यासाठी साखर आयुक्तालयाने सुमारे 1,132 कोटी रुपयांच्या 10 साखर कारखान्यांचे प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. तीन साखर कारखान्यांच्या प्रस्तावाची आयुक्तालय स्तरावर छाननी सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात साखर कारखान्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली असून राज्यातील अनेक राजकारणी सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांच्या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) कडून कर्ज मिळवण्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांची एफआरपी देणे, कामगारांची देणी भागविणे, ऊस हंगाम सुरू करण्यासाठी निधीची उपलब्धता आणि ऊस तोडणी- वाहतूक खर्चासाठी आर्थिक तरतूद आदी कारणासाठी कर्जाची मागणी केली आहे. 10 साखर कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तालय स्तरावर तपासून कर्ज मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश…

 पुणे जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांपैकी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्याशी संबधित रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याने (शिरूर) 107.69 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. इंदापूर येथील छत्रपती साखर कारखान्याने 140 कोटी कर्जाची मागणी केली आहे. छत्रपती कारखाना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकाचा आहे. सोलापूरचे माजी आमदार धनाजी साठे यांच्या श्री संत कुर्मदास कारखाना – 59.70 कोटी, सोलापूरच्या कल्याणराव काळे यांच्या संत शिरोमणी वसंतराव काळे कारखाना – 146.32 कोटी, अहमदनगरमधील आप्पासाहेब राजळे आणि आमदार मोनिका राजळे यांचा वृद्धेश्वर कारखाना – 99.07 कोटी, अहमदनगरमधील अगस्ती कारखाना – 75 कोटी, लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर कारखाना- 100 कोटी, बीडमधील जय भवानी कारखाना – 150 कोटी, माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांचा सुंदरराव सोळंके कारखाना – 104.18 कोटी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी (युनिट 1) कारखाना – 150 कोटी रुपये अशा एकूण 10 कारखान्यांचे  एकूण 1,131 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.

आयुक्तालय स्तरावर सोलापूरच्या संत दामाजी कारखाना (75 कोटी), स्वामी समर्थ कारखाना (50 कोटी) आणि अहमदनगर येथील कुकडी कारखान्याच्या (100 कोटी) प्रस्तावांची छाननी सुरु आहे. लवकरच या कारखान्यांच्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप नेत्यांच्या कारखान्यांना कर्ज वाटप…

 माळशिरस (जि. सोलापूर) येथील माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला 113 कोटी 42 लाख, खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी कारखान्याला 126 कोटी 38 लाख, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी संस्थेला 150 कोटी रुपये व नीरा भीमा सहकारी संस्थेला 75 कोटी रुपये, मंत्री रावसाहेब दानवे यांच्या श्री रामेश्वर सहकारी संघाला 34 कोटी 74 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबधित लातूरच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला लवकरच 50 कोटी रुपये मंजूर केले जाणार आहेत.

‘पुढारी’शी बोलताना साखर संचालक (वित्त) यशवंत गिरी म्हणाले की, एनसीडीसीकडून 5 साखर कारखान्यांच्या कर्ज मंजुरीसाठी राज्य सरकारने 499 कोटी 54 लाख रुपये वितरित केले आहेत. राज्य सरकारच्या हमीवर सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जावरील व्याजदर ९.४६ टक्के आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या 10 प्रस्तावांची छाननी पूर्ण झाली असून ते पुढील कर्ज मंजुरीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मंजूर कर्जाची रक्कम, नवीन मंजूर प्रस्ताव आणि तपासलेले कर्ज मंजुरीचे प्रस्ताव विचारात घेतल्यास एकूण कर्जाची रक्कम 1,900 कोटी रुपये होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here