महाराष्ट्र : थकीत एफआरपी प्रकरणी चार साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी थकवणाऱ्या राज्यातील चार साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाई करावी असे आदेश साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये या कारखान्यांनी ऊस बिले थकवली आहेत. चार कारखान्यांकडे मिळून ३७.१८ कोटी रुपये थकित एफआरपी असल्याने त्यांच्यावर आरआरसीची कारवाई झाली आहे.

ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी सांगितले की, राज्यातील १४६ साखर कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिल्याचे स्पष्ट झाले. इतर ६५ कारखान्यांकडून ६९२ कोटी रुपये एफआरपी देणे अद्याप येणे-बाकी आहे. थकीत एफआरपीप्रकरणी गेल्या आठवड्यात राज्यातील ८६ साखर कारखान्यांकडील ८१७ कोटी रुपयांच्या साखर आयुक्तांनी नोटिसा पाठवल्या होत्या. गेल्या आठवड्यात त्याची सुनावणी घेतली. त्यानंतर २१ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपये एफआरपी अदा केली.

पैसे थकविणाऱ्या कारखान्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर (२.४६ कोटी), पुणे जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना (१५.७७ कोटी), सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट (११.५४ कोटी) आणि हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना (७.४१ कोटी) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here