महाराष्ट्र: ऑक्सिजन निर्मितीसाठी साखर कारखाने तयार

233

मुंबई: कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीची तयारी केली आहे.

याबाबत, नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे (एनएफसीएसएफ) कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, कोविड १९च्या रुग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कारखान्यांनी तयारी केली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांनी उपचलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. सुमारे २५ कारखाने ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत. आम्ही आर्थिकदृष्ट्या चांगली कामगिरी केलेल्या ६० ते ७० कारखान्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे कारखाने ग्रामीण भागात आहेत. ते परिसरातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करतील.

नाईकनवरे म्हणाले, ऑक्सिजन प्लान्टसाठी डिस्टिलरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. याशिवाय इथेनॉल उत्पादनात अडचणी येऊ नयेत याचीही कारखान्यांना काळजी घ्यावी लागेल. ऑक्सिजन पुरवठा ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. याशिवाय ते एक व्यावसायिक उत्पादनही बनू शकते. इतर राज्यातील कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठीही एनएफसीएसएफ प्रयत्न करीत असल्याचे नाईकनवरे म्हणाले.

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी यासाठी साखर कारखानदारांशी चर्चा केली होती. महाराष्ट्रात चालू हंगामात गाळप करणाऱ्या १९० पैकी १७३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. तर १७ कारखाने अद्याप सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here