महाराष्ट्र : राज्यात गळीत हंगाम एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता

पुणे / कोल्हापूर : यंदा फेब्रुवारी संपत आला तरी यंदा राज्यातील केवळ ८ साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्यावर्षी २७ फेब्रुवारीअखेर तब्बल ४५ साखर कारखाने बंद झाले होते. यंदा हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी ऊस तोडणी वेळेवर केली जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कारखाना प्रतिनिधी व शेतकऱ्यांमध्ये ऊस तोडीवरून संघर्ष कायम आहे. त्यामुळे पावसाअभावी उसाची वाढ चांगली न झाल्याने यंदाचा ऊस हंगाम लवकर संपेल हा अंदाज खोटा ठरला आहे. सद्यस्थितीत यंदाचा हंगाम एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यात आतापर्यंत ८८४ लाख टन ऊस गाळप झाले आहे. सरासरी १० टक्के उताऱ्याने ८८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत ९५३ लाख टन उसाचे गाळप करून ९४ लाख टन साखर उत्पादित झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उताऱ्यात अल्प वाढ आहे. गेल्यावर्षी ९.८६ टक्के साखर उतारा होता. यंदा तो १० टक्क्यावर गेला आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक, ११.३६ टक्के आहे. विभागात सर्वाधिक २३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागात १०.२८ टक्के साखर उताऱ्याने १९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. नगर विभागात ९.६६ उताऱ्याने १० लाख टन साखर तयार झाली. छत्रपती संभाजीनगर विभागात तीन कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर, पुणे, नगर, सोलापूर विभागात केवळ एकेक कारखाना बंद झाला आहे. तोडणी कामगार नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here