मुंबई : महाराष्ट्र उन्हाच्या झळांनी होरपळून निघत आहे. आणि अद्याप मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप शिल्लक आहे. उच्चांकी ऊस उत्पादनामुळे गेल्या हंगामात गालप पूर्ण करणाऱ्या १४२ कारखान्यांच्या तुलनेत यंदा केवळ ४२ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. मराठवाडा विभागातील बहूतांश उसाचे गाळप सुरू आहे. अनेक कारखान्यांना कामगारांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. ऊस तोडणी कामगार उन्हामुळे काम अर्धवट सोडत आहेत किंवा जादा पैसे मागत आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांना शेजारील ऊस उत्पादक राज्यांतून हार्वेस्टर आणावे लागले आहेत. ऊस हार्वेस्टरसाठी कर्नाटक, गुजरातशी संपर्क केला जात आहे. कारखाने गाळप पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कारण साखर आयुक्तालयाने त्यांना गाळप बंद करण्यापूर्वी लेखी परवानगी घेण्याची अट घातली आहे.
हार्वेस्टर दररोज ५.७ एकर ऊस तोडणी करतो. तर कामगारांकडून एका दिवसात १.५ एकरातील ऊस तोडला जातो. राज्यात सरासरी ८ ते १० लाख मजूर ऊस तोडणी करतात. महाराष्ट्रातील पारंपरिक ऊस क्षेत्र सांगली, कोल्हापूरमधील कारखान्यांनी हंगाम पूर्ण केला आहे. मात्र, पुणे, सोलापूर, मराठवाडा, अहमदनगर जिल्ह्यातील कारखाने अद्याप गाळप करीत आहेत.
फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, ३१ मे पूर्वी गाळप पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात सरासरी १२० ते १४० दिवसांचा साखर हंगाम असतो. उच्चांकी हंगाम १४५ दिवसांचा आहे. मात्र, यंदा २० हून अधिक कारखाने १६० दिवस सुरू राहतील.
या हंगामात महाराष्ट्रातील कारखान्यांकडून उच्चांकी साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. आतापर्यंत हंगामातील १९८ कारखान्यांनी १२२.८ मिलियन टन ऊसाचे गाळप करून १२.८१ मिलियन टन साखर उत्पादन केले आहे.