माळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भेट घेतली. यावेळी राज्याप्रमाणेच माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ’महाविकासआघाडी’ पॅटर्न राबविण्याचे संकेत पवार यांनी दिले. याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ विरोध असताना देखील करण्यात आली. मात्र, अपेक्षित पध्दतीने कारखाना चालला नाही. कारखान्यात अनेक वेळा ऊसाचा रस वाया गेला. गेटकेन गाळपाला प्राधान्य देण्याच्या सत्ताधार्‍यांंच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे गहु पिकाचे नुकसान झाले. मध्यंतरी निरा डावा कालव्याबाबत निर्णय झाला. त्यावेळी सत्ताधार्‍यांच्या विचाराचे सरकार असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका पवार यांनी केली. इथुन पुढे माळेगावला बाहेरच्या ऊसाशिवाय गत्यंतर नाही. 3400 रुपये दर सत्ताधार्‍यांनी दिला आहे. त्यापैकी 234 रुपये अद्याप मिळालेले नाही. पाच वर्षात 50 रुपयांची ठेव मिळालेली नाही. जवळपास 284 रुपये देणे बाकी आहे. राजकारण खुल्या मनाने करायचे असते तर त्यांनी नवीन संचालक मंडळ येण्याची वाट पाहणे अपेक्षित होते, असा टोला पवार यांनीमाळेगांवच्या सत्ताधार्‍यांना लगावला.

महाविकास आघाडीकडुन जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. 2 लाखांच्या पुढील, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तो निर्णय घेताना राज्य सरकारला झेपेल, विकासकामांवर परीणाम होणार नाहि, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. बारामती तालुक्याला कर्जमाफीचा 120 कोटींचा लाभ होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी सहकारमहर्षी म्हणवून घेणार्‍या सत्ताधार्‍यांनी त्या काळात सुरवातीला साखर नाममात्र दराने विकली. त्यामुळे सभासदांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. अनावश्यक नोकरभरती करुन शेतकर्‍यांच्या प्रपंचाचे नुकसान केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्तविक केले. मदन देवकाते, योगेश जगताप, गुलाबराव देवकाते, अनिल जगताप विश्‍वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती नीता बारवकर, किरण गुजर, संदीप जगताप, केशव जगताप, संजय भोसले, शौकत कोतवाल आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here