अनेक मोठे देश ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समध्ये सामील होण्यास तयार: तेल मंत्री हरदीप सिंग पुरी

नवी दिल्ली : अनेक प्रमुख देश ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समध्ये सामील होण्यास तयार आहेत, जे भारताच्या G२० अध्यक्षतेखालील प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. एनर्जी वर्ल्ड डॉटकॉममध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ते म्हणाले की, ब्राझील, भारत आणि अमेरिका सध्या इतर इच्छुक देशांसोबत मिळून भागिदारीत काम करत आहेत. याचा उद्देश परिवहन क्षेत्रासह, शाश्वत जैवइंधनाच्या वापरास समर्थन आणि गती देणे असा आहे, असे पुरी यांनी सांगितले.

पुरी हे इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित एका उद्योगविषयक कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, जैव इंधनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर ती भारताच्या यशस्वीतेची कहाणी आहे. आम्ही जागतिक जैव इंधन संघटन तयार करण्यास सक्षम होण्यासाठी जी २०च्या आपल्या अध्यक्षपदाचा उपयोग करीत आहोत. आणि खूप मोठे देश यामध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. ते म्हणाले की, सरकारने आधीच नोव्हेंबर २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला होता. आयात बिलावरील आमची बचत ४१,००० कोटी रुपये होती. जेथे २०३० पर्यंतच्या उद्दिष्टाचा विषय होता, आम्ही ते २०२५ पर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री पुरी म्हणाले की, भारताच्या देशांतर्गत गॅस उत्पादनात गेल्यावर्षी १८ टक्क्यांनी वाढले आहे. आणि त्यामुळे देशाला अधिक गॅसची गरज आहे. २०१४ मध्ये आम्ही १४ कोटी एलपीजी सिलिंडरचे वितरण करत होतो तर, आज ३१.५ कोटी सिलिंडरचे वितरण करत आहोत. भारतातील देशांतर्गत पीएनजी कनेक्शन फेब्रुवारी २०२३ मध्ये २५.४ लाखांवरून १.०५ कोटींपर्यंत वाढले आहेत. आमच्याकडे २०१४ मध्ये १४,००० किमीचे गॅस पाइपलाइन नेटवर्क होते. ते ३३,०० पर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही आताच २३,५०० किमीवर पोहोचलो आहोत, असे ते म्हणाले.

पुरी यांनी असेही सांगितले की, भारत उपलब्धता, सामर्थ्य आणि स्थैर्यासोबत ऊर्जा संकटाशी यशस्वी लढा देत आहे. ते म्हणाले की, देश आपल्या कच्च्या तेलाची ८० टक्के गरज आणि ५० टक्के गॅसची गरज आयातीच्या माध्यमातून पूर्ण करीत असूनही सरकारने गेल्या वर्षी जागतिक बाजारातील चढ-उतारानंतरही इंधनाच्या किमती वाढीस परवानगी दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here