उत्तर प्रदेश : लवकर ऊस बिले दिल्याबद्दल मवानातील शेतकऱ्यांकडून सरकारचे अभिनंदन

मवाना : उत्तर प्रदेशातील मवाना येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांची बिले वेळेवर दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले आहे. मवानातील बहुतांश मतदार ऊस शेतीशी जोडले गेले आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघात हा भाग येतो. उत्तर प्रदेश सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य आहे. २०२०-२१ मध्ये यूपीत २७.४० लाख हेक्टर ऊस उत्पादन झाले होते.

ऊस उत्पादक संजय गुर्जर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, गेल्या पाच वर्षात कारखान्यांकडून वेळेवर ऊस बिले मिळाली आहेत. मात्र, समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात आम्हाला दोन वर्षानंतर पैसे मिळाले होते. शेतकरी ललित कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणे गरजेचे असते. आम्हाला १० दिवसांत पैसे मिळत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या पिकाचे पैसे वेळेवर मिळत असलेतरी विजेचे दर हा एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ते इतर पक्षांना संधी देऊ इच्छितात. आणि सरकार बदलण्याची त्यांची इच्छा आहे.

हस्तिनापूरचे आमदार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश खटिक यांनी सांगितले की, आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले दिली आहेत. २०१७ पूर्वी १५० कोटी रुपयांची थकबाकी होती. योगी सरकारने त्याची तत्काळ पूर्तता केली. आता १० दिवसांत बिले मिळत असल्याने शेतकरी खुश आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होत आहे. फेब्रुवारी महिन्यात १०, १४, २०, २३ आणि २७ असे पाच टप्प्यातील मतदान होईल. तर मार्च महिन्यात ३ आणि ७ रोजी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होईल. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ४०३ पैकी ३१२ जाांवर विजय मिळवला होता. पक्षाने निवडणुकीत ३९.६७ टक्के मते मिळवली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला ४७, बहुजन समाज पक्षाला १९ आणि काँग्रेसला ७ जागा जिंकता आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here