१३ सप्टेंबरच्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे : राजू शेट्टी

कोल्हापूर : कारखानदारांकडून गेल्या गळीत हंगामातील प्रति टन ४०० रुपये येणे बाकी आहे. कारखानदारांनी थकीत रक्कम दिल्याशिवाय आगामी हंगामात धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणगले तालुक्यातील किणी येथे बोलताना दिला. तसेच १३ सप्टेंबरला निघणाऱ्या कोल्हापूरच्या मोर्चात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रायगढ येथून सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ऊसदर जनजागृती सभेचे किणी येथे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी अण्णासो हवालदार होते. अरहनाथ मगदूम यांनी स्वागत केले. अमित दणाने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. जागतिक बाजारपेठेत रासायनिक खतांचे दर ३५ टक्क्यांनी कमी झाले असताना आपल्या सरकारने मात्र सबसिडी कमी करून शेतकऱ्यांच्या पदरात जादा दराने खते घातली.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्याची मागणी केली. विनायक पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी माजी सरपंच बाळगोंडा पाटील, महावीर पाटील, दीपक घाटगे, रणजित निकम, राहुल जाधव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तुषार पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here