यांत्रिकीकरण ऊस शेतीमध्ये फार महत्वाचा घटक: संजय खताळ

पुणे : यंदा महाराष्ट्रात ऊच्चांकी ऊस पिक तयार झाले. त्यामुळे तोडणीच्या कार्यक्रमावर प्रचंड ताण पडला. यावर उपाययोजना करण्यासाठी ऊस गाळपात यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ मध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पुणे, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आदींच्या सहयोगाने या राज्यस्तरीय साखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर होते. चीनीमंडी या राज्यस्तरीय साखर परिषदेचे मीडिया पार्टनर आहे. आणि eBuySugar स्ट्रिमिंग पार्टनर आहे.

चर्चासत्रात व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले की, राज्यातील १७५ सहकारी साखर कारखान्यांपैकी १०० कारखान्यांचा गळीत हंगामात सहभाग होता. यंदा प्रचंड पिकामुळे ऊस तोडणीत अडचणी आल्या. ऊस पिकाचे क्षेत्र ११.२५ लाख हेक्टर असल्याचा अंदाज होता. मात्र यात बदल होऊन हे क्षेत्र १३.२५ लाख हेक्टर असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वीचा राज्याचा १,०१२ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा उच्चांक मोडून यावर्षी आतापर्यंत १,३१७ लाख टन उत्पादन झाले आहे.

व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले की, यापूर्वीचा महाराष्ट्राचा साखर उत्पादनाचा उच्चांक १०६ लाख टन होता. यावर्षी आताच १३७ लाख टन झाले आहे. म्हणजे ३१ लाख टन साखर जास्त निर्माण झाली आहे. आणखी २४ कारखाने सुरू असल्याने यात आणखी वाढ होणार आहे. इथेनॉलसाठी वळविण्यात आलेली साखर लक्षात घेता आताच राज्यात प्रचंड प्रमाणात उत्पादन झाले आहे.

संजय खताळ म्हणाले की, ऊस तोडणी आणि वाहतूक या बाबींकडे आगामी हंगामासाठी आपण अधिक गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. यासाठी यांत्रिकीकरण खूप गरजेचे आहे. भारतातील पाच हार्वेस्टर उत्पादकांकडे उपलब्ध मशीनची किंमत ७२ लाख ते १०७ लाख रुपयांपर्यंत आहे. देशातील सध्या उपलब्ध असलेल्या १६०० ऊस तोडणी यंत्रांपैकी ५० टक्के म्हणजे ८२४ हार्वेस्टर महाराष्ट्रात आहेत. इतर राज्यांतील ऊस यांत्रिकीकरणाच्या तुलनेत राज्याची गती चांगली आहे. हार्वेस्टरची विक्री कमी असल्याने उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे किंमतीही कमी झालेल्या नाहीत. उत्पादन क्षमतेपेक्षा कमी विक्री होत आहे. महाराष्ट्राचे ऊसाचे क्षेत्र दरवर्षी वाढतेय. यावर्षी नव्या हंगामात ऊस लागवड क्षेत्र १३ लाख ६७ हजार हेक्टर असेल अशी शक्यता आहे. जर पाऊस चांगला राहिला तर पुढील वर्षी स्थिती भयावह असेल. पूर्वहंगामीत लागणीत वाढ होऊन ऊस क्षेत्र साडेचौदा लाख हेक्टरपर्यंत जाईल. अशा स्थितीत ऊस तोडणीसाठी १८७० हार्वेस्टरची गरज आहे. त्यामुळे आणखी किमान एक हजार यंत्रांची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाल्याशिवाय ऊस हंगाम गतीने पुढे जाणार नाही, असे खताळ यांनी सांगितले.

यांत्रिकीकरणासाठीच्या अनुदान योजनांचा विस्तार होण्याची गरज आहे. अनुदान नसतानाही मशीन विकली गेली आहेत. मात्र अनुदानाशिवाय यांत्रिकीकरणाचे गणित परवडणारे नाही. याशिवाय, मशीनने केलेल्या तोडणीत पाचटाचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी ऊस लागणीत सरीचे अंतर पाच फुटांचे हवे. यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून कारखान्यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे असे खताळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here