आगामी उन्हाळा आणि त्याची हाताळणी, याबाबत उपाययोजनांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा, यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. संबंधित केंद्रीय मंत्रालये/विभागांचे सचिव आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता असलेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित होते.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) हवामानाबाबतची जागतिक स्थिती आणि मार्च ते मे 2023 या कालावधीतील तापमानाच्या अंदाजाबाबत सादरीकरण केले. मार्च 2023 च्या दुसऱ्या पंधरवड्याचा हवामानाचा अंदाजही सादर करण्यात आला.
मार्च ते मे 2023 या कालावधीतील तापमानाचा अंदाज वर्तवताना आयएमडी ने माहिती दिली की, ईशान्य, पूर्व आणि मध्य भारतात आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य स्तरावरील कमाल तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. आयएमडीने असेही सांगितले की दक्षिण द्वीपकल्पीय भारतात किमान तापमान सामान्य ते सामान्य पातळी पेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, देशाच्या उर्वरित भागात ते सामान्य पातळी पेक्षा जास्त राहील, असा अंदाज आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सचिवांनी सांगितले की, रब्बी पिकाची स्थिती आतापर्यंत सामान्य आहे, आणि गव्हाचे उत्पादन सुमारे 112.18 दसलक्षटन अपेक्षित आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने गव्हावरील अती तीव्र उष्णतेच्या ताणाचे निरीक्षण करण्यासाठी आणि तो हाताळण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन केली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांनी माहिती दिली की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जुलै 2021 मध्ये उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखडा (NAP-HRI) जारी केला असून, यामध्ये उष्णतेची लाट आणि उष्णतेशी संबंधित आजारांचे आव्हान आणि त्याचे प्राथमिक स्तरापासून, तृतीय स्तरावरील व्यवस्थापन याची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी राज्यांना अत्यावश्यक औषधे, इंट्राव्हेनस फ्लुइड्स, आइस पॅक, ओआरएस आणि पिण्याचे पाणी यासारख्या आरोग्य सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्याची सूचना दिली. आवश्यक आयईसी/जागरूकता सामग्रीचा वेळेवर प्रसार आणि प्रादेशिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
महासंचालक (वन) [DG(F)], पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC)यांनी जंगलातील आगी/ वणवेयांच्या व्यवस्थापनासाठी तयारी दर्शविणारा कृती आराखडा सादर केला.
केंद्रीय गृह सचिवांनी गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ति व्यवस्थापन प्राधिकरणने (NDMA)यासंदर्भात केलेल्या पूर्वतयारी ची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की की उष्णतेची लाट रोखण्यासाठी आणि उष्णतेच्या व्यवस्थापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे 2016 मध्ये जारी करण्यात आली होती आणि ती 2017 आणि 2019 मध्ये सुधारित करण्यात आली होती. राज्यांना सर्व स्तरांवर उष्णता कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मार्च, एप्रिल आणि मे 2023 मध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीवर जनजागृतीचे कार्यक्रम प्रसारित केले जातील. NDMA सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून समुदाय संवेदना अभियानाचे नेतृत्व करेल.
केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या सचिवांनी मार्च 2023 पर्यंत ऊर्जा प्रकल्पातील सर्व देखभालीची कामे पूर्ण करण्याच्या गरजेवर भर दिला. नियंत्रित वीज संयंत्रांच्या माध्यमातून कोळशाचे उत्पादन वाढवण्याचे आवाहनही त्यांनी पंजाब आणि राजस्थान या राज्यांना केले.पेयजल आणि स्वच्छता, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या विभागांच्या सचिवांनी पिण्याचे पाणी, सिंचन आणि चारा यासंबंधी सुचवलेल्या उपाययोजनांची रूपरेषा सांगितली.
केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी सांगितलं की 2023 च्या उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त उष्णता असण्याची शक्यता आहे. याच्याशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुरेशी तयारी करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रालये/विभाग हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सर्वोत्तम तयारीची पातळी सुनिश्चित करण्यासाठी आणि वेळेवर उष्णतेची झळ कमी करण्यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी जवळून काम करत आहेत. त्यांनी मुख्य सचिवांना संबंधित विभागीय सचिव आणि जिल्हाधिकार्यांसह संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या प्रतिरोधासाठीच्या तयारीचा आढावा घेण्याचे आवाहन केले.
(Source: PIB)