नामनिर्देशित प्राधिकरण, कोळसा मंत्रालयाने आज येथे व्यावसायिक कोळसा खाण लिलावाअंतर्गत कोळसा खाणींच्या यशस्वी बोलीदारांना 22 कोळसा खाणींच्या उत्खननाचे अधिकार प्रदान करणारे आदेश जारी केले आहेत. 22 कोळसा खाणींपैकी 11 कोळसा खाणी (विशेष तरतुदी) अधिनियम, 2015 अंतर्गत आहेत आणि उर्वरित खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम, 1957 अंतर्गत येतात.16 कोळसा खाणी पूर्णपणे अन्वेषण केलेल्या खाणी आहेत तर 6 खाणी अंशतः अन्वेषण केलेल्या खाणी आहेत.
22 कोळसा खाणींची संचयी सर्वोच्च दर क्षमता (PRC) 53 दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) आहे आणि यामध्ये सुमारे 6,379.78 दशलक्ष टन (MT) भूगर्भीय साठे आहेत. या खाणींमधून9,831 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे आणि 7,929 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक या खाणी आकर्षित करतील. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 71,467 लोकांना यातून रोजगार मिळेल.
या 22 कोळसा खाणींचे अधिकार प्रदान करण्यासह, कोळसा मंत्रालयाने आजपर्यंत एकूण 73 कोळसा खाणींसाठी 149.304 MTPA च्या एकत्रित PRC सह व्यावसायिक लिलावांतर्गत अधिकार आदेश जारी केले आहेत. यामुळे विविध राज्य सरकारांना 23,097.64 कोटी रुपये वार्षिक महसूल मिळेल आणि 2,01,847 लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
(Source: PIB)